दीनानाथ मंगेशकर
दीनानाथ मंगेशकर (डिसेंबर २९, इ.स. १९००- एप्रिल २४, इ.स. १९४२) हे मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार होते. या गायक नटाला श्री.कृ. कोल्हटकरांनी मास्टर ही उपाधी बहाल केली आणि तेव्हापासून ते मास्टर दीनानाथ मंगेशकर झाले.
जन्म आणि संगीताचे शिक्षण
गोमंतकातील मंगेशी येथे त्यांचा जन्म झाला. अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने हीदेखील देवाने दिलेली देणगी होती. बाबा (रघुनाथ मामा) माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू. त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्यक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून त्यांनी गाणं मिळवलं. त्या काळात सुमारे पाच हजार दुर्मिळ रागरागिण्यांचा, चिजांचा संग्रह त्यांच्याकडे होता. त्यांचे गायन म्हणजे चमत्कृती आणि माधुर्य यांचा मिलाफ होता.
नाट्यसृष्टीतील कारकीर्द
इ.स. १९१४ मध्ये बालगंधर्वांनी स्वत:ची गंधर्व नाटक मंडळी सुरू केल्यावर किर्लोस्कर नाटक मंडळींत दीनानाथांचा प्रवेश झाला. १९१५ मध्ये ‘ताजेवफा’ या हिंदी नाटकात कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका त्यांनी केली. तेथे दीनानाथ चार वर्षे होते. १९१८ मध्ये त्यांनी एका ध्येयवादी, नावीन्याची आवड असलेली साहित्यप्रेमी अशा ’बलवंत संगीत मंडळी’ नावाच्या नाटक कंपनीची स्थापना केली.
अभिनय
गडकर्यांनी ‘भावबंधन’ हे नाटक केवळ बलवंत मंडळींसाठीच लिहिले. या नाटकातील लतिका, ‘पुण्यप्रभाव’मधील कालिंदी, ‘उग्रमंगल’मधील पद्मावती, ‘रणदुंदुभी’मधील तेजस्विनी, ‘राजसंन्यास’मधील शिवांगी या भूमिका दीनानाथांनी आपल्या गायनाभिनयाने विशेष गाजविल्या. ‘उग्रमंगल’ नाटकात ‘छोडो छोडो बिहारी’ या ठुमरीवर ते नृत्य करीत. हा ठुमरी नाच हे त्या काळी रंगभूमीवरचे फार मोठे आकर्षण ठरले होते. ‘मानापमान’मध्ये धैर्यधर, ‘ब्रह्मकुमारी’मध्ये तपोधन इ. पुरुष भूमिकाही केल्या. पण ध्येयवादी, आक्रमक, स्वतंत्र बाण्याच्या त्यांच्या स्त्री भूमिका खूप गाजल्या. लोकमान्य टिळकांनी पुरस्कारलेल्या होमरूल चळवळीच्या फंडासाठी दीनानाथांनी ‘पुण्यप्रभाव’चा प्रयोग केला होता. दीनानाथांच्या ’बलवंत संगीत मंडळी’ने महाराष्ट्रभर फिरत राहून नाट्य संगीत गावोगाव पोचविले, आफ्रिकेचा दौरा आखला आणि हिंदी नाटकांची गुजराती रूपे करून बसविली. गोमंतकात या गायक नटाला कोल्हटकरांनी मास्टर हे उपपद लावले.
मास्टर दीनानाथांचा अभिनय असलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव)
- उग्रमंगल (पद्मावती)
- चौदावे रत्न (त्राटिका)
- झुंझारराव (जाधवराव)
- पुण्यप्रभाव (कालिंदी, किंकिणी)
- ब्रह्मकुमारी (गौतम, प्रबोधन)
- भावबंधन (लतिका)
- मानापमान (धैर्यधर)
- रणदुंदुभी (वेणू, तेजस्विनी)
- राजसंन्यास (पद्मावती, शिवांगी)
- रामराज्यवियोग (शिवांगी)
- वेड्यांचा बाजार (राम)
- शाकुंतल(शकुंतला)
- शारदा (शारदा)
- संन्यस्त खड्ग (सुलोचना)
मास्टर दीनानाथांचे संगीत असलेली नाटके (अपूर्ण यादी)
- ब्रह्मकुमारी (लेखक : विश्वनाथ चिंतामण बेडेकर - विश्राम बेडेकर)
- संन्यस्त खड्ग (लेखक : विनायक दामोदर सावरकर)
दीनानाथ मंगेशकर यांची स्मारके
दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने अनेक संस्था उभ्या केल्या गेल्या आहेत. तर काही जुन्याच संस्थांना त्यांचे नाव नव्याने देण्यात आले आहे. त्यांचे नाव असलेल्या काही संस्था :
- गोव्यातील कला अकादमीमधले मास्टरदीनानाथ मंगेशकर सभागृह
- दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ल पूर्व, मुंबई;(आसनसंख्या१०१०)
- दीनानाथ नाट्यगृह, सांगली. (हे नाट्यगृह पाडून तेथे नवीन नाट्यगृह बांधण्याचे घाटते आहे--२०१२मधली बातमी)
- मास्टर दीनानाथ सभागृह (गोव्याच्या कला अकादमीतले एक सभागृह)
- दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे
दीनानाथ मंगेशकरपुरस्कार
दीनानाथ मंगेशकर यांची पहिली पुण्यतिथी २४ एप्रिल १९४३ या दिवशी होती. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कन्या लता मंगेशकरदीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान स्थापन केले आहे. या प्रतिष्ठानातर्फे इ.स. १९८८ सालापासून दरवर्षी २४ एप्रिल या दिवशी, समाजसेवा, नाट्यसेवा, साहित्य, रंगभूमी, चित्रपट, रंगभूमी आणि आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींस (१) आनंदमयीपुरस्कार, (२) मोहन वाघ पुरस्कार, (३) वाग्विलासिनी पुरस्कार (४)रंगभूमीपुरस्कार आणि (५) दीनानाथ मंगेशकर स्मृतीपुरस्कार देण्यात येतात. पुरस्काराचे स्वरूप एक लाख एक हजार एक रुपये रोख (सुरुवातीला ही रक्कम ५० हजार रुपये होती), आणि सन्मानचिन्ह असे आहे.
- आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती, त्यांचे क्षेत्र, पुरस्काराचे नाव आणि वर्ष
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा